Sunday, 13 December 2009

माझी या प्रियाला प्रित कळेना

हा माझा पहिलाच लिहीण्याचा प्रयत्न, सांभाळून घ्याल अशी अपेक्षा. :)

तसे गाणे हा माझा प्रांतच नाही. म्हणजे मला एखादा/दी सुरात आहे की बेसूर हे पण नीट कळत नाही, त्या मुळे TV वरील गाण्यांच्या कार्यक्रमात लोक सुर लागला नाही वगैरे सारखी मते देतात तेव्हा आपण अगदीच हे आहोत असे वाटते . पण रावसाहेबांसारखंच कोणी गल्ली चुकले की जाणवते मात्र नक्की. तमाम गायकांची माफी मागून हे म्हणेन की मला गाणे हा डोंबाऱ्यांच्या खेळासारखं वाटते, म्हणजे जिथे फार उंची वर स्वत: चा तोल सांभाळून खेळ दाखवावा लागतो. जरा जरी तोल गेला तरी खेळ खलास.
गाण्यात मला कोणताच प्रकार वर्ज्य नाही. जे काही चांगले ते सर्व आवडते, पण खरे सांगायचे तर जिथे गाणे मनाला भिडते ते खरे गाणे असे माझे मत. तरीही सेमी क्लासीकल कडे जरा जास्तच ओढा.

तर सांगायचा मुद्दा हा की इथे मला भावलेल्या काही गाण्यांबद्दल आणि गायकांबद्दल लिहायचा विचार आहे. तुमच्या प्रतिक्रिया समजून घ्यायला नक्की आवडतील

सुरवात जरा हटके :)

शोभा गुर्टू.

मी ८-१० वर्षांचा असताना माझ्या मामकडून 'पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा' ची ओळख झाली, त्या काळी अजून एक गाणे आणि गायीका या पलीकडे काही फार वाटले नाही, पण हळू हळू यांचे गाणे आवडू लागले.
'पिकल्या पानाचा देठ की वो हिरवा' ऐकताना आपण मागच्या जन्मी कोणीतरी राजे, महाराजे, जमीनदार आहोत आणि जगातील काही अत्त्युत्तम कलावंत आपल्या मनोरंजनासाठी त्यांची कला पेश करत आहेत असा फील यायचा. या गाण्यातील भाषा मस्त वाटायची. एकेका शब्दाचे प्रेझेंटेशन आवडू लागले, कळू लागले. मला वाटते या प्रकाराला बैठकीची लावणी म्हणतात.

आणि मग तो क्षण आला, आणि त्या गाण्याची ओळख झाली. हि एक ठुमरी.

माझी या प्रियाला प्रित कळेना

काय गाणे आहेत, काय शब्द आहेत आणि काय प्रेझेंटेशन आहे. त्यातील पहील्या वाक्यातच जी विकेट जाते, ती आपल्याला परत उभेच राहू देत नाही, आपण फक्त वाहावत जावे आणि त्यातच तृप्त व्हावे.

माझी या प्रियाला , प्रित कळेना
अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना


यातील 'हाय' मधे पूर्ण गाण्याचे सार उतरवले आहे. जोडीदारावर आणि जोडीदाराचे पण प्रेम आहे, पण कुठे तरी काही तरी जुळत नाही आहे, आणि त्या वेदना येणारी पुर्ण भावना त्या 'हाय' मधे उतरल्या सारखी वाटते. परंतू या वेदनेत नैरश्य नाही, आणि माझ्या मते हे गायीकेचे यश आहे.

उमाकांत काणेकर यांचे शब्द ही तितकेच सुंदर आहेत आणि श्रीकांत ठाकरे यांचे संगीतही.

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महीना
आवरू मनाला कैसे, मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला, कळूनी वळेना

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजुनी त्याचा, सुखाचा मिळेना

वसंतात नाही बोले, श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनिचे, कळेनाच काही
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना

ह्या गाण्याने पोहोचणाऱ्या भावना, शब्दात मांडणे माझ्या सारख्यांना तरी अशक्य वाटते आहे, पण तुम्ही पण शोभा गुर्टुंना ऐकले असेल आणि त्यांचे पंखे असाल तर तुमच्या भावना नक्की शेअर करा.

माझ्या कडे या गाण्याची MP3 आहे, पण share कशी कराची ते माहीत नाही. नाहीतर ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यासाठी नक्की share ले असते.


विश्व जालावरील मराठी जग

मराठी टंकलेखन प्रमाणीकरण

गेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे. परंतू मला माझ्या लॅपटॉप शिवाय मराठी टंकलेखन करावे लागले, तर मात्र गमभन, क्वीलपॅड किंवा बराहा सारखी इतर सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. दुर्देवाने प्रत्येक पध्धतीत थोडेफार व्हेरीएशन्स आहेत. सुरवातीला हौसेच्या दिवसात हे ठिकही होते, परंतू संगणक जगतात मराठीला जर सर्वमान्यता मिळवायची असेल तर मला वाटते, टंकलेखन पध्धतीत प्रमाणीकरणाची नितांत आवश्यकता आहे. जर प्रमाणीकरण नसेल तर मला नाही वाटत की मराठी टंकलेखन हौशी वर्तूळाबाहेर पडून सर्वसामान्यांपर्यत पोहोचेल.

मी iTRANS ही पध्धत वापरली आहे, आणि ती पध्धत मला आवडली, परंतू इतर पध्धतींबद्दल आपली मते असतील तर नक्कि मांडा.

महाराष्ट्र सरकार कडून माझ्या या बद्दल काही फार अपेक्षा नाहीत. राहूल भालेराव (लिनक्स वर SCIM पध्धतीत, रेड हॅट मधील राहूल भालेराव यांचे योगदान आहे), ॐकार जोशी सारख्या सर्वांना आपण यात निमंत्रित करून प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करू शकतो.

हे सोपे तर नक्की नाही, परंतू शक्य नक्की आहे. काय म्हणता?




विश्व जालावरील मराठी जग